..........केल्याने होत आहे रे.....आधी "संपर्क" पाहिजे.........

पन्नाशी सामाजिक महाराष्ट्राची


 

सामाजिक कामांच्या प्रेरणांचा बोध, बलस्थानांचा वेध आणि भविष्यातल्या आव्हानांचा शोध
संपादन: मेधा कुळकर्णी

महाराष्ट्राचं हे सामाजिक संशोधन.
महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार आणि त्यासाठी कृती करू इच्छिणार्याा अशा सगळ्यांनी वाचलंच पाहिजे असं हे पुस्तक.
महाराष्ट्राचं आहे हे पुस्तक!

इथे भेटेल एका साध्या कौटुंबिक घटनेतून प्रेरणा घेत अन्यायग्रस्त महिलांचं घर बनलेली संस्था, महापालिकेसह राजकीय पक्षांच्या धोरणाला पर्यावरणानुकूल दिशा देणारे युवक, किनारपट्टीवरच्या जैववैविध्याची राखण करणारे पर्यावरणप्रेमी, आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानातून ग्रामविकास घडवून आणण्यासाठी कटिबद्ध शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ, एचआयव्हीग्रस्त मुला-मुलींना सन्मानाच्या जगण्याकडे घेऊन जाणारे कार्यकर्ते, विधवा-परित्यक्त्या-घटस्फोटितांचं सर्वात मोठं नेटवर्क, नोकरदार महिलांच्या घरचा अविभाज्य घटक होऊन बसलेल्या मोलकरणींची संघटना, टीआरपी-बाजारपेठेच्या दबावाखाली मुख्य प्रवाहातल्या माध्यमांकडून दुर्लक्षित विषयांचं वृत्तांकन-विश्लेषण करणारे नवपत्रकार, स्त्रियांवर होणार्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणारा पुरुषांचा गट, ‘तलाक’ या शब्दाची भीती सोडून स्वतःची मंजिल शोधताना अनेकींच्या आयुष्याला वळण लावणारी स्त्री, गायरान जमिनींच्या आधारे दलितांना विकासाच्या वाटेने नेणारे कार्यकर्ते, पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपडणार्यान संस्था, बचतगटांच्या माध्यमातून स्त्रियांचं आत्मभान जागं करणारी कामं, गरीबांच्या कळीच्या मुद्यांबाबतच्या धोरणावर प्रभाव टाकणारे उच्चशिक्षित व्यावसायिक, वंचितांच्या अभिव्यक्तीला नाटक-चित्रपटासारखी माध्यमं उपलब्ध करून देणारे नाटकवेडे ...आणि महाराष्ट्र घडवणार्याच अनेकअनेक संस्था-संघटना!

महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार आणि त्यासाठी कृती करू इच्छिणार्याे अशा सगळ्यांनी वाचलंच पाहिजे असं हे पुस्तक.

महाराष्ट्राचं आहे हे पुस्तक!

  • संपादनसहाय्य : सुलेखा नलिनी नागेश, सुजाता परांजपे
  • संशोधन सहाय्य: महेश पोतदार, उस्मानाबाद / मनीषा सावळे, अमरावती
  • लेखनसहभाग: मनीषा सावळे, अमरावती / महेश पोतदार, उस्मानाबाद / शिवाजी कांबळे, नांदेड / हनुमान लव्हाळे, ऒरंगाबाद / दिग्विजय जिरगे, सोलापूर / सुलभा शेरताटे, माधुरी पेटकर, नाशिक / अभिजित नांदगावकर, रत्नागिरी / रोहित तांबोळी, सातारा / वर्षा जोशी आठवले, गीतांजली वैशंपायन, आरती गोखले, गायत्री राजवाडे, मानसी आपटे, कमलेश ढवळीकर, सुनीता लोहकरे, रुपाली गावंडे, पल्लवी गाडगीळ, पुणे / सुलेखा नलिनी गणेश, सोनाली कुळकर्णी, वृशाली ऎगळीकर, अनुजा मेस्त्री, माधवी कुळकर्णी, रुपेश इंगळे, पूजा दामले, मुंबई
 

संपर्क चा लाभ घ्या


सामाजिक संस्थांसाठी माध्यम कौशल्य प्रशिक्षण.


सामाजिक कार्यकर्त्यांनी माध्यमांचं महत्व समजून घेत माध्यमांची नीट ओळख करून घेऊन माध्यमशक्तीचा सकारात्मक उपयोग करून घ्यावा यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा. यात खालील विषयांचा समावेश आहे.

आपल्या विषयाची परिणामकारक मांडणी - तोंडी आणि लेखी
वृत्तपत्र माध्यमाची तपशिलात माहिती
वृत्तपत्रासाठी निवेदन / बातमी लिहिणे
रेडिओ आणि टिव्ही या माध्यमांची ओळख
या दृक्‍-श्राव्य माध्यमात सहभागी होण्याची कौशल्ये
• संवाद कौशल्य आणि माध्यमांचा परिणामकारक वापर
मुलाखत कौशल्य
माईक आणि कॅमेरा यांच्यापुढे मुद्देसूद बोलणं
केस स्टडी लिहिणं
माध्यमांशी संपर्क विकसित करणं
लेखनाचं अंग असणार्यांतसाठी लेख कसा लिहायचा हे प्रशिक्षण.

• उदयोन्मुख पत्रकारांना प्रशिक्षण.

पत्रकारांनी सामाजिक प्रश्नांवर कसं लिखाण करावं याचं मार्गदर्शन. प्रसारमाध्यमांत दररोजच्या डेडलाइनचा दबाव, कामाची धावपळ यामुळे पत्रकारांना वेळ अपुरा पडतो हे लक्षात घेऊन 'संपर्क' पत्रकारांसाठी सामाजिक विषयांवरील कार्यशाळा आयोजित करते.
• संस्थांच्या कामाचं परिणामकारक डॉक्युमेंटेशन
• केस स्टडी लिखाण
• रेडिओ कार्यक्रमांची निर्मिती
• ऍडव्होकसी मोहिमांचं आयोजन
• सामाजिक विषयांबाबत जागरुक पत्रकार आणि माध्यमांबाबत सक्षम कार्यकर्ते यांचं नेटवर्क तयार करणं.

 

  


संपर्क विशेष


Small Steps Big Leap - एक पक्की सुरुवात

 


 

मुंबई, नवी मुंबई, पुणे, मालेगाव, नागपूर, नांदेड, सोलापूर इथल्या शुअर स्टार्ट प्रकल्पात सहभागी झालेल्या वस्त्यांमध्ये चला. अर्चना, जयश्री, ताईबाई, ज्योति, दीप्ती, महादेवी, उर्मिला, रिझवाना, झाकिया, सुलताना, आरती, ममता यांना आणि यांच्यासारख्या आरोग्यसख्यांना भेटा. आणि ऎका त्यांच्या यशकथा. यापैकी निवडक २० कथा या पुस्तकात वाचायला मिळतील. ज्यांचा उल्लेख एनजीओवाले ‘ग्रासरुट’ असा करतात, सरकार ज्यांना ‘दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्या’ असं संबोधन वापरतं, उच्चभ्रूंच्या शब्दकोशात जे ‘स्लम’वाले असतात ते समाजातल्या उतरंडीतल्या अगदी तळातले लोक किती मोठं आणि मोलाचं काम करू शकतात त्याची लख्ख जाणीव हे पुस्तक वाचल्यावर होईल.
 

संपादक : हेमंत कर्णिक

लेखन सहभाग:महेश पोतदार, मनिषा सावळे, सोनाली कुलकर्णी, शिवाजी कांबळे, दिग्विजय जिरगे, वर्षा जोशी-आठवले, सुलभा शेरताटे, माधुरी पेटकर, वृषाली ऎगळीकर, माधवी कुळकर्णी
 

२००७ साली महाराष्ट्रातल्या सात शहरांमध्ये सुरू झालेला,‘पाथ’ या आंतरराष्ट्रीय संस्थेची मुख्य भागीदारी असलेला ‘शुअर स्टार्ट’ प्रकल्प हे महाराष्ट्रातलं माता आणि नवजात शिशुंच्या आरोग्याची काळजी घेणारं शहरी भागात होणारं पहिलंच काम होतं. माता आणि नवजात शिशुंच्या आरोग्याची हेळसांड ग्रामीण आणि आदिवासी भागातच जास्त होते या समजुतीला ‘शुअर स्टार्ट’ने छेद दिला. वस्त्यांमधल्या गरजूंचं शिक्षण-प्रबोधन करत त्यांच्यासाठी असलेल्या योजना-सुविधा त्यांच्यापर्यंत घेऊन जाणं अथवा योजना-सुविधा देणार्याब यंत्रणेपर्यंत लोकांना हात धरून घेऊन जाणं ‘शुअर स्टार्ट’ने स्थानिक एनजीओंच्या सहकार्याने केलं. ‘शुअर स्टार्ट’प्रकल्पाने ‘राष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन’मध्ये कोणत्या प्रकारे काम केलं जावं याचे उत्तम नमुनेच धोरणकर्त्यांना तयार करून दिले. अन्य सात संस्थांसोबत ‘संपर्क’नेही या कामात भागीदारी केली. त्यातूनच झाली या पुस्तकाची निर्मिती.
 

या कामातून शहरी वस्त्यांचं वास्तव पुढे आलं. सरकारी यंत्रणांवर टीका करत राहाणं, योजनांच्या अंमलबजावणीमधल्या उणीवा शोधत बसणं, शासन-प्रशासनाबरोबर संघर्ष करणं या नेहमीच्या मार्गाहून निराळा रस्ता ‘शुअर स्टार्ट’ने पकडला.

देशात आणि महाराष्ट्रात वातावरण असं आहे की काही चांगलं घडेल, कोणी काही चांगलं घडवेल अशी आशा राहिलेली नाही लोकांना. कुटंबात, मित्रमंडळींमधे गप्पा करताना, वृत्तपत्रांत, न्युज चॅनल्सवर आणि फेसबुक- ट्विटरवरसुद्धा चढा सूर असतो नकाराचा. कामं होत नाहीत, नोकर्यात मिळत नाहीत, पगारवाढ नाही, घर विकत घेता येत नाही, ऍडमिशन नाही, कचरा साफ केला जात नाही, ट्रॅफिकमधून वाट काढता येत नाही, पाणी नाही, वीज नाही, डॉक्टर उपलब्ध नाही, उपचार नाही, न्यायच मिळत नाही.........सगळ्या नुस्त्या नकारघंटा! पण वास्तव नक्की असं नकारी आहे का?
 

२००७ ते २०११ या काळात झालेल्या कामाच्या दरम्यान दहा लाख लोकसंख्या ‘शुअर स्टार्ट’च्या कवेत आली. सात शहरांतल्या वस्त्या माता-शिशुंच्या आरोग्याबद्दल साक्षर झाल्या. वस्त्यांमधल्या २०० महिला आरोग्यसखीचं काम करण्यासाठी आणि ५० जणी कामावर देखरेख ठेवण्यात प्रशिक्षित झाल्या. गरोदरपणातले धोके टाळण्याचे आणि नवजात बाळांना मृत्युपासून वाचवण्याचे उपाय त्यांना समजले. सरकारी योजनांची माहिती मिळाली आणि त्यांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अशा यंत्रणेतल्या खाचाखोचाही कळल्या. याहून आणखीही काही घडलं. वस्त्यांमधल्या बिनचेहर्या च्या असल्यासारख्या बायांना ठळक ओळख मिळाली. त्यांचा आत्मविश्वास फुलून आला. आपल्याच वस्तीच्या भल्यासाठी आणि आपल्यासारख्याच इतर बायांसाठी काम करण्यातून मिळणार्या समाधानाने त्यांची अंधारलेली आयुष्यं उजळून निघाली. सर्वात महत्त्वाचं हे घडलं की आपण आपली परिस्थिती बदलू शकतो हा विश्वास त्यांच्या ठायी जागा झाला.
 

प्रकल्पाचं यशापयश मोजण्याचे विविध मापदंड असतात. आणि त्यानुसार तो जोखला जाईलच. पण सर्व मापदंडांच्या पलीकडचं एक वास्तव आहे. या आमच्या बहिणी आता स्वस्थ बसणार नाहीत. प्रकल्प संपला तरी त्यांना ‘शुअर स्टार्ट’मधून मिळालेली ऊर्जा त्या स्वतःच्या, कुटंबाच्या आणि वस्तीच्या विकासासाठी उपयोगात आणत रहाणार हे नक्की. प्रकल्पातून मिळालेल्या अनुभवाची शिदोरी घेऊन आयुष्यात त्या एक सुरूवात करणार आहेत, एक पक्की सुरूवात!

त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!